देखभालीसह शुल्क संकलनासाठी एजन्सीची करणार नियुक्ती
बेळगाव : विविध माध्यमातून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. महापालिकेच्या मालकीच्या शहरातील विविध गाळ्यांचा लिलाव करण्यासह आता अशोकनगर येथील जलतरण तलावाचा देखील देखभाल व शुल्क संकलनासाठी लिलाव केला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून 4 लाख 55 हजार 500 रुपयांची निविदा काढण्यात आली असून संबंधित एजन्सीला यासाठी 11 हजार 400 रुपयांची अनामत रक्कम पाच वर्षांसाठी ठेवावी लागणार आहे.
बेळगाव महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. थकीत घरपट्टी, व्यापार परवाने त्यानंतर आता ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतीची नोंदणी केली जात असल्याने या माध्यमातून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. केवळ 20 दिवसात तब्बल 2 कोटी रुपयांचा महसूल ए आणि बी खात्यांतर्गत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
त्याचबरोबर महापालिकेच्या मालकीचे असलेले महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळ्यांसह शहरातील विविध ठिकाणी असलेल्या 98 गाळ्यांचा लिलाव महापालिकेकडून केला जाणार आहे. 12 वर्षांसाठी सदर गाळे भाडे तत्त्वावर दिले जाणार असून गाळ्यांची देखील लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. या माध्यमातून महापालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. त्यानंतर आता महापालिकेतर्फे अशोकनगर येथे विकसित करण्यात आलेल्या जलतरण तलावाचा देखील लिलाव केला जाणार आहे.
तलावाची देखभाल करण्यासह शुल्क संकलनासाठी एजन्सीला सदर तलाव दिला जाणार आहे. यासाठी 4 लाख 55 हजार 500 रुपयांची निविदा मागविली आहे. यासाठी संबंधित एजन्सीला 11 हजार 400 रुपयांची अनामत रक्कम पाच वर्षांसाठी महापालिकेकडे ठेवावी लागणार आहे. जाहीर लिलावाच्या स्पष्टीकरणाची अंतिम तारीख 26 मार्च सायंकाळी 5 पर्यंत आहे. तर जाहीर लिलावात सहभागी होण्याची शेवटची तारीख 29 मार्च सायंकाळी 5 पर्यंत आहे. तलावाची देखभाल आणि शुल्क संकलनासाठी इच्छूक असणाऱ्या एजन्सीने लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांच्यावतीने करण्यात आले आहे.









