बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील जय किसान भाजी मार्केटनजीकच्या बायपास रोडवर कचरा आणून ओतणाऱ्या एका मालवाहू टेम्पोवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. सोमवार दि. 7 रोजी महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून टेम्पो चालकाकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून शहरातील कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र नवीन ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, ते हटवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह दंडात्मक कारवाई करूनदेखील नागरिकांत अद्यापही म्हणावी तशी जागृती झालेली नाही. कचरा टाकू नये, असे फलक लावण्यात आलेल्या ठिकाणीही कचरा टाकून दिला जात आहे. त्यामुळे आता महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बायपास रोडवर कचरा टाकण्याचे प्रमाण आता वाढले आहे. टेम्पोतून भरून आणलेला कचरा कोणी नसतानाचे पाहून ओतून दिला जात आहे. त्यामुळे बायपास रस्त्यांना गलिच्छ स्वरूप प्राप्त होत आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील जय किसान भाजी मार्केटनजीकच्या बायपासवर काहीजण टेम्पोतून कचरा ओतून देत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पाळत ठेवून कचरा टाकणारा टेम्पो पकडण्यात आला. संबंधित टेम्पो चालकाकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.









