100 किलो प्लास्टिक जप्त : 12,800 रुपयांचा दंड वसूल
बेळगाव : बंदी असतानाही सिंगल युज प्लास्टिकची विक्री करणाऱ्या बाजारपेठेतील तीन दुकानांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईत 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 12,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सरकारने सिंगल युज प्लास्टिकची विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. तरीदेखील बाजारपेठेतील काही घाऊक प्लास्टिक विक्रेत्यांकडून खुलेआम प्लास्टिकची विक्री केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने जनजागृती करण्यासह संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही प्लास्टिकची विक्री थांबलेली नाही. अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांनी प्लास्टिक विक्री आणि वापरावर पूर्णपणे निर्बंध आणावेत, अशी सूचना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना केली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून छापेमारी करून कारवाई केली जात आहे. बाजारपेठेतील तीन घाऊक प्लास्टिक विक्रेत्यांकडून सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर दुकानांवर छापा टाकला. त्यावेळी 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यासह 12,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आरोग्य विभागाने केलेल्या या कारवाईमुळे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









