250 किलो प्लास्टिक जप्त : कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ
बेळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य आणि पर्यावरण विभागाकडून सिंगल यूज प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सुरूच आहे. सोमवारी पांगुळ गल्ली व कामत गल्ली येथील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून 250 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकची विक्री आणि वापरावर बंदी असली तरीदेखील खुलेआम विक्री सुरूच आहे. सिंगल यूज प्लास्टिकची विक्री करण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यासह दंडात्मक कारवाई केली जात असली तरी मनपाला प्लास्टिक विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण आणता आलेले नाही.
त्यामुळे रविवार पेठ, पांगुळ गल्ली, तेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली आदी ठिकाणच्या प्लास्टिक विक्रेत्यांकडून अद्यापही विक्री सुरूच आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाकडून यापूर्वीही अनेकवेळा छापेमारी करून कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच तीन दुकानांवर कारवाई करून एक क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. त्यानंतरही बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकची विक्री होत असल्याची माहिती मिळताच मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता प्रवीणकुमार, अदिलखान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पांगुळ गल्ली आणि कामत गल्लीतील दुकानांवर छापे टाकून कारवाई केली. या कारवाईवेळी 250 किलो प्लास्टिक जप्त करण्यासह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई तीव्र : मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्याकडून आदेश
रस्ते आणि नाल्यांमध्ये आढळून येणारे प्लास्टिकचे ढीग, सिंगल यूज प्लास्टिकमुळे परिसर आणि आरोग्यावर होणाऱ्या दूष्परिणामांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतींना केली आहे. शनिवार दि. 21 रोजी राज्य सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी हा आदेश जारी करताच प्लास्टिक विरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. परिसर संरक्षण कायदा सेक्शन 5 नुसार आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकार 2016 नुसार कॅरीबॅग यासह 120 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू (सिंगल यूज प्लास्टिक) उत्पादन, विक्री, साठा, वितरण आणि वापर करण्यावर बंदी आहे.
या नियमांचे राज्यात कटाक्षाने पालन करण्याची सूचना एका लेखी आदेशाद्वारे करण्यात आली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद, ग्राम पंचायत, तालुका पंचायत आदींनी रस्ते, नाले आदी ठिकाणी आढळून येणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, त्याचबरोबर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही केली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन-विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. परिसर संरक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, तातडीने सिंगल यूज प्लास्टिकवर कठोर निर्बंध आणावेत, येत्या पंधरा दिवसांत याची अंमलबजावणी करून अहवाल पाठविण्यात यावा, असा आदेश सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी जारी केला आहे. आदेशाची प्रत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झाली असून बेळगाव महानगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.









