बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या चार स्थायी समित्यांची निवडणूक मंगळवार दि. 12 रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडणार आहे. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून निवडणुकीची सर्व तयारी करण्यात आली असून प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर यांच्या उपस्थितीत ही निवडणूक होणार आहे. स्थायी समित्यांचा कार्यकाळ संपून महिना उलटला आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे दोनवेळा निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अखेर 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सदर निवडणुकीत 58 नगरसेवक, 7 पदसिद्ध सदस्य असे एकूण 65 मतदार मतदान करणार आहेत. 22 व्या स्थायी समित्यांच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 ते 12 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. दुपारी 3 वाजता प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होईल. त्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रारंभी सदस्यांची हजेरी घेतली जाईल. बैठकीसाठी आवश्यक कोरम पडताळणी केली जाईल. त्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. वैध उमेदवारी अर्जांची माहिती जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास वेळ दिला जाईल. आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर केला जाईल.
बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही कायम राहणार का?
यापूर्वी केवळ 2009 मध्ये स्थायी समित्यांसाठी मतदान झाले होते. त्याआधी व त्यानंतर बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही कायम राहणार का? हे मात्र पहावे लागणार आहे.









