कोल्हापूर :
सध्या महापालिकेच्या बहुतांश शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पण इतरही शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे. त्यामुळे ज्या शाळांनी सेमी इंग्लिश वर्गासाठी परवानगी मागितलेली आहे. त्या सर्व शाळांना परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन मनपा उपायुक्त साधना पाटील यांच्याकडे समितीच्या शिष्टमंडळाने दिले.
निवेदनात म्हटले आहे, मनपाच्या इंग्रजी शाळा सुरू झाल्यामुळे पटसंख्या वाढीस चालना मिळेल. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना मोफत इंग्रजी शिक्षण देणे सोयीचे होणार आहे. यावर गरजेप्रमाणे सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ तसेच सीसीटीव्ही व स्वच्छता गृहसाठी डीपीडीसीमधून निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे उपायुक्त साधना पाटील यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, संजय पाटील, संजय कडगावे, सुभाष धादवड, वसंत आडके, फारुक डबीर, उत्तम कुंभार, शकील भेंडवडे, उमर जमादार इत्यादी उपस्थित होते.
समितीच्या प्रमुख मागण्या अशा :
नवीन शिक्षक, सेवकांची नियुक्ती करावी
पर्यवेक्षक व मुख्याध्यापक रिक्त पदे त्वरित भरावीत
शिक्षकांच पगार वेळेवर देण्यात यावा,
शाळांच्या दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी आवश्यक निधी द्यावा
पटसंख्या, गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाने मुलभूत सुविधा पुरवाव्या
वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे
वेतन आयोगातील थकीत फरक रकमा द्याव्या








