नागरिकांची वाढली वर्दळ, अधिकारी महापालिकेत तळ ठोकून
बेळगाव : विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन हाती घेतल्याने गत आठवड्यात चार दिवस महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते. बेळगावसह राज्यातील 10 महानगरपालिकांमध्ये हे आंदोलन सुरू असल्याने मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे महापालिकेचे कामकाज सुरू होते. मंगळवारीदेखील कामकाज सुरू राहणार असून मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीवर पुढील आंदोलनांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
कर्नाटक राज्य महापालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवार दि. 8 पासून कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली. त्यामुळे बेळगावसह राज्यातील 10 महानगरपालिकेचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. तर पहिल्या दिवशी बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर आंदोलन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेसमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत कामबंद आंदोलन केले. शनिवारी सुट्टीदिवशीदेखील संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्यात आले होते. आंदोलनाची दखल सरकारने घेतली असून मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंगळवारी या मागण्यांबाबत चर्चा होणार असून मागण्या मान्य झाल्यास आंदोलन मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. एखाद्यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीतर पुन्हा आंदोलन हाती घेण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सोमवारी नेहमीप्रमाणे दिवसभर महापालिकेचे कामकाज व्यवस्थितरित्या सुरू होते. चार दिवसापासून रखडलेली कामे अधिकाऱ्यांनी हातावेगळी केली. मंगळवारीही महापालिका सुरू राहणार आहे. आंदोलन सुरू असले तरी जन्म मृत्यू दाखले विभाग सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. सोमवारी मनपा आयुक्तांसह बहुतांश अधिकारी महापालिकेत दिवसभर तळ ठोकून होते. नागरिकांची वर्दळ कायम होती.









