विसर्जन मार्गावरील फलक हटवून रस्ता केला मोकळा
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून हे फलक होते. विसर्जन मिरवणूक संपताच तातडीने सर्व फलक हटविण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मोहीम राबविली. फलक काढताना अनेक फलक फाडले गेले. त्यामुळे काहीजणांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे. बेळगावचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. जवळपास 400 च्या आसपास गणेशोत्सव मंडळे असून त्याठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, याचबरोबर विविध जाहिराती संदर्भातील फलक लावण्यात आले होते. गल्लोगल्ली, तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर हे फलक झळकत होते. कपिलेश्वर तलाव परिसरातही फलकांची उभारणी करण्यात आली होती. गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर गुरुवारी तातडीने शहरातील हे फलक हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिकेचे कर्मचारी दिवसभर या कामामध्येच गुंतले होते. अनेक फलक उंच ठिकाणी लावल्यामुळे कर्मचाऱ्यांना फलक काढताना त्रास सहन करावा लागला. काहीजणांनी त्याला विरोधही केला. इतर फलक हटवा, तेव्हाच आपला फलक हटवा, असा आग्रह काहीजणांनी धरला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.









