फाईलची मिळणार माहिती : मिळकतधारकांतून निर्णयाचे स्वागत
बेळगाव : ई-आस्थी प्रणालीअंतर्गत ‘ए’ व ‘बी’ खात्यासाठी अर्ज दाखल केलेल्या मिळकतधारकांना त्यांच्या फाईलसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी महानगरपालिकेकडून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून ई-आस्थी प्रभावीपणे आणि जलदगतीने अंमलात आणण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे मिळकतधारकांतून स्वागत केले जात आहे. गोवावेस येथील विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रभाग क्र. 1 ते 20 साठी हेल्पलाईन नंबर 7483112829, कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रभाग क्र. 21 ते 39 साठी हेल्पलाईन नंबर 7996742132 सुरू केले आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 40 ते 50 च्या अखत्यारित येणाऱ्या मिळकतधारकांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारतीत सुरू करण्यात आलेल्या 0831-2405316 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
ई-आस्थीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी विलंब लावण्यात येत आहे. दिलेल्या फाईलमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी सांगत मिळकतधारकांना माघारी धाडण्यासह त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ई-आस्थीसाठी विभागीय कार्यालयांमध्ये जे अर्ज येतील त्यांची एका वहीत नोंद करून घेण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार आलेल्या फाईलींची नेंद करून घेतली जात आहे. अलीकडेच मनपा आयुक्त शुभा बी. यांनी दोन दिवसांत स्वत: साडेतीन हजारहून अधिक फाईलींचा निपटारा केला होता. सिरीयलनुसार आलेल्या फाईलींना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. मात्र दिलेल्या फाईलवर कार्यवाही होत आहे की नाही, फाईल सध्या कोणत्या स्टेजवर आहे, याची माहिती मिळकतधारकांना मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मिळकतधारकांना फाईलसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी सदर हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांनी सदर क्रमांकावर संपर्क साधल्यास फाईलसंदर्भातील अपडेट मिळणार आहे.









