बसस्थानक ते दरबार गल्लीपर्यंत कारवाई
बेळगाव : रहदारी पोलीस आणि महापालिकेच्यावतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी खडेबाजार रोडवरील मध्यवर्ती बसस्थानक ते दरबार गल्ली दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले जाहिरात फलक व इतर अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले असून कारवाईनंतर खडेबाजार रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
मध्यंतरी वाहतूक पोलिसांकडून गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली आदी ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी विशेषकरून गणपत गल्लीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, या कारवाईला व्यापाऱ्यांतून तीव्र विरोध झाल्याने कारवाई गुंडाळण्यात आली होती.
त्यानंतर मंगळवारी पुन्हा वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून खडेबाजार रोडवरील मध्यवर्ती बसस्थानक ते दरबार गल्ली दरम्यानच्या दुतर्फा लावण्यात आलेले जाहिरात फलक व इतर अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईलाही काही ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी दुकानाबाहेर लावण्यात आलेले फलक व अतिक्रमण हटवून ते ताब्यात घेतले. या कारवाईमुळे खडेबाजार रोडने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. मात्र, या कारवाईत सातत्य राहणार का? हे पहावे लागणार आहे.









