बेळगाव : शहरापासून जवळच पण ग्राम पंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून महापालिकेच्या हद्दीत कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याने महापालिकेकडून कंग्राळी खुर्द, पिरनवाडी, हिंडलगा, बेनकनहळ्ळी या ग्राम पंचायतींना आपापल्या हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सोमवार दि. 13 रोजी पत्रव्यवहार करत सूचना करण्यात आली. शहरात सध्या जिकडेतिकडे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कचराकुंडीत कचरा टाकण्याऐवजी लोकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. ब्लॅकस्पॉट हटविण्यासह कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे.
कचऱ्याची वेळेत आणि योग्य पद्धतीने उचल करण्यात यावी, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांवर दबाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरातील जनतेकडून कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले जात आहे. तरीही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहर व उपनगरातील कचऱ्याची उचल महापालिकेकडून केली जाते. मात्र, ग्राम पंचायतींच्या हद्दीत टाकला जाणारा कचरा संबंधित पंचायतींकडून उचल केला जातो. पण शहरापासून जवळच असलेल्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून महापालिकेच्या हद्दीत कचरा टाकला जात आहे. ग्राम पंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांनी ग्राम पंचायतींच्या हद्दीतच कचरा टाकावा, यासाठी जनजागृती करावी. तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मनपाकडून शहरापासून जवळ असलेल्या ग्राम पंचायतींना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये कंग्राळी खुर्द, हिंडलगा, पिरनवाडी, बेनकनहळ्ळी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे.









