मनपाला ईपीआरची आशा : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंट कंपन्यांशी करार
प्रतिनिधी / बेळगाव
शहराचा विस्तार वाढू लागला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या प्र्रमाणातदेखील वाढ होऊ लागली आहे. मनपाने सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास यश मिळविले आहे. पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवारीबाबत शहर आघाडीवर आहे. एप्रिल 2022 ते जुलै 2023 दरम्यान महापालिकेने 13,651 टन कचऱ्याचे संकलन केले आहे. शिवाय संबंधित कचरा सिमेंट कंपन्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
मनपाने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंट कंपन्यांशी करार केला आहे. या कंपन्या कच्च्या मालासाठी सुका कचरा वापरू लागल्या आहेत. शहरातील दैनंदिन संकलनातून सुका कचरा कंपन्यांकडे पाठविला जात आहे. यापासून इतर वस्तू बनविल्या जात आहेत. त्यामुळे कचऱ्यातूनही नवनिर्मिती होऊ लागली आहे. सिमेंट कारखान्यांद्वारे दैनंदिन 300 टनहून अधिक कचऱ्याचा पुनर्वापर होऊ लागला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच मनपाचा सुका कचरा विल्हेवारीचा ताण कमी झाला आहे.
मनपा कचरा विल्हेवारीच्या प्रक्रियेत आघाडीवर आहे. त्यामुळे मनपाला (ईपीआर) प्रमाणपत्र मिळणार आहे. आवश्यक ती कागदपत्रे मनपाकडून दिली जात आहेत. त्यामुळे मनपाला येत्या काळात हे प्रमाणपत्र बहाल केले जाणार आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारी बेळगावची महानगरपालिका देशात तिसरी ठरणार आहे. विशेषत: येत्या काळात पाच टन प्लास्टिक कचरा वापरून 100 ते 200 मीटर रस्ता तयार करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. बागलकोट जिल्ह्यातील कंपन्यांशी सुक्या कचऱ्याबाबत करार झाला आहे. त्यामुळे कचऱ्यापासून या कंपन्या दररोज पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करू लागल्या आहेत.
तुरमुरी कचरा डेपोतदेखील दैनंदिन अडीचशे टन कचरा जातो. मात्र त्याठिकाणी जागेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सुका कचरा बागलकोटकडे पाठविला जात आहे.









