बैठकीची नोटीस पुन्हा केवळ कन्नड-इंग्रजीतूनच
बेळगाव : महापालिकेची सर्वसाधारण बैठक शनिवार दि. 3 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून बैठकीची नोटीस अधिकारी व नगरसेवकांना कौन्सिल विभागाकडून बुधवार दि. 23 रोजी पाठविण्यात आली आहे. बैठकीत गोडसेवाडी दुसरा क्रॉस येथील सिंगल लेआऊटमध्ये 14 पीआयडी क्रमांक देणे, वेगा हेल्मेट घरपट्टी प्रकरण, लक्ष्मी मार्केट आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीत प्रभाग क्र. 6 मधील नाला दुरुस्ती, मालमत्ता कर आणि वसुली, वॉर्ड क्र. 24 मधील महात्मा फुले रोडवरील गटार आणि आरसीसी स्लॅब, महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी कंत्राटी पद्धतीवर अधिकाऱ्याची नियुक्ती करणे,
पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे हटविणे, पथदीप, हायमास्ट बसविणे, महापालिकेच्या मालकीच्या संरक्षण भिंती, बसथांबे आदी ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावणे, महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा अल्पोपाहार, प्रभाग क्र. 34 मधील शाहूनगर येथील भागात घर बांधण्यासाठी कंग्राळी बी. के. ग्रा. पं. कडून बांधकाम परवाना देण्यासह घरपट्टी वसुली केली जात आहे, याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्र. 2 मध्ये येणाऱ्या खंजर गल्ली येथील महापालिकेच्या मालकीचे असलेले लक्ष्मी मार्केट येथे व्यापार संकुल उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांचा अष्टधातू पुतळा उभारणे, प्रभाग क्र. 32 मधील हनुमाननगर बॉक्साईट रोड येथे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधण्यात आलेल्या अवैज्ञानिक गटारी व रस्त्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
मराठी भाषेतूनही नोटीस देण्याची मागणी
महापालिपेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नडबरोबरच मराठी भाषेतूनही देण्यात यावी, अशी मागणी म. ए. समितीच्या नगरसेवकांकडून केली जात आहे. मात्र कौन्सिल विभागाकडून नोटीस केवळ कन्नड व इंग्रजी भाषेत दिली जात आहे. यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीची नोटीस महापौर मंगेश पवार यांनी पुढाकार घेत बैठकीवेळी मराठीत दिली होती. मात्र शनिवार दि. 3 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस पुन्हा केवळ कन्नड व इंग्रजी भाषेतून देण्यात आली आहे.









