प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता महालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. याबाबतची नोटीस दि. 19 रोजी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांना कौन्सिल विभागातर्फे जारी केली आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, हिंदी व मराठी भाषेतूनही देण्यात येत होती. मात्र यावेळीची नोटीस केवळ कन्नड भाषेतूनच दिली आहे. त्याचबरोबर महालिकेत होत असलेल्या कानडीकरणाबाबत म. ए. समिती व राष्ट्रीय पक्षातील मराठी नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सभेत मागील बैठकीचे इतिवृत्ताचे वाचन करून पुष्टी करण्यात येणार आहे. 21 मे रोजी झालेल्या नगररचना व विकास स्थायी समिती बैठकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, वाहन व यंत्रसामुग्रीसाठी मागविलेल्या निविदांना मंजुरी देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ये-जा करण्यासाठी असलेल्या भूमार्गावर पाणी साचून राहते. किल्ला तलावाच्या देखभालीसाठी ई&-निविदा मागविण्याबाबत, मनपा अनुदान कृती आराखड्याला मंजुरी देण्याबाबत, विविध संघांना भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्ता भाडेदर सुधारण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.









