वाहनापेक्षा पार्किंग करण्याची काळजी अधिक : तोडगा काढण्यासाठी महापालिकेने केलेले सर्व प्रस्ताव कागदावरच
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परिणामी वाहनधारकांना वाहनापेक्षा पार्किंग करण्याची काळजी अधिक वाटत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने अनेक प्रस्ताव तयार केले. पण सगळे प्रस्ताव कागदावरच आहेत. मात्र येथील रेल्वे विभागाच्यावतीने बहुमजली पार्किग बांधण्याचा प्रस्ताव हाती घेवून पूर्ण केला आहे. त्यामुळे हा आदर्श महापालिकेने घेण्याची गरज आहे.
शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहनाची संख्या सुमारे दोन लाखाच्या घरात पोहचली असल्याने वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या भेडसावत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने अनेक प्रस्ताव तयार केले.
भंगीबोळात दुचाकी वाहने लावण्याचा प्रस्ताव बारगळला
अद्याप एकही प्रस्ताव मार्गी लागला नाही. परिणामी पार्किंगची समस्या सोडविण्यास महापालिकेला अपयश आले आहे. पार्किगची समस्या सोडविण्याच्यासाठी भंगीबोळात दुचाकी वाहने लावण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला. याची अंमलबजावणी करण्यात आली. पण अस्वच्छ असणाऱ्या भंगीबोळात वाहने पार्क करण्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच चोरीच्या भितीपायी वाहनधारकांनी वाहने पार्क करण्याकडे पाठ फिरविली. कचरा वाहतूक करण्यासाठी जाणाऱ्या वाहनाना अडथळा निर्माण होत असल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. यामुळे बहुमजली पार्किंग बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. बापट गल्ली येथील महापालिकेच्या खुल्या जागेत चार चाकी वाहनासाठी बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव तयार करून सहा वर्षे झाली. मात्र अद्याप मार्गी लागला नाही. परिणामी वाहनधारकांना वाहने पार्क करण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी वाहने लावून जातात. यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होतात. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेमध्ये अनेकवेळा चर्चा करण्यात आली. पार्किंग समस्या सोडविण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक, बापट गल्ली, लक्ष्मी मार्केट, कॅम्प येथील पोलीस लाईनच्या खुल्या जागेत अशा विविध ठिकाणी बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे सर्व प्रस्ताव अद्याप कागदावर आहेत. प्रस्ताव राबविण्यास महापालिकेला अपयश आले आहे.
रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग समस्या सुटण्याच्या मार्गावर
रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. याठिकाणी पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुमजली पार्किग बांधण्याची योजना हाती घेऊन मार्गी लावली आहे. यामुळे येथील पार्किंगची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. रेल्वे स्थानकाजवळील जागेत हा प्रकल्प राबविण्यात आला असून लवकरच खुला होणार आहे. मात्र हा प्रकल्प राबविताना रेल्वे प्रशासनाने कोणताच गाजावाजा केला नाही. महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाची चर्चा वारंवार होत असते. मात्र मार्गी लागत नाहीत. यामुळे रेल्वे विभागाचा आदर्श घेऊन महापालिकेने बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.