विजय चव्हाण,इचलकरंजी
येथील इचलकरंजी नगरपालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला असून यामुळे विविध पदांवरील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शहरातील बेरोजगारांना संधी मिळणार आहे. पण याचवेळी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी तब्बल 18 वर्षे प्रतीक्षा सूचीत असलेल्या 80 उमेदवारांचा प्रश्नही समोर आला आहे. यापैकी काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आता नवीन आकृतीबंध तरी या उमेदवारांची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा फळास आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
येथील महापालिकेचा आकृतीबंध नुकताच मंजूर झाला असून विविध खात्यातील सुमारे 1744 पदांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे शहरातील अनेक बेरोजगारांना संधी मिळणार असल्याचे प्रशासन तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण याचवेळी अनुकंपा तत्त्वाखाली नगरपालिका व सध्याच्या महानगरपालिकेत हक्काची नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून तब्बल 17 वर्षांपासून प्रतीक्षा यादीत असलेल्या सुमारे 80 उमेदवारांचा प्रश्नही समोर आला आहे.
तत्कालीन नगरपालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना हक्काची नोकरी मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या वारसांची सूची तयार करण्यात आली. पण 2005 सालापासून या सूचीत नाव असूनही हे वारस उमेदवार नोकरी मिळण्यासाठी संबंधित नगरपालिका, महानगरपालिकेसह शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. यासाठी अनेक जिल्हाधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंत्रालय तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला आहे. पण अजूनही यापैकी अनेकांना न्याय मिळालेला नाही.
तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेमध्ये अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 68 उमेदवारांची यादी शंभरीपार गेली आहे. कर्मचाऱ्यांना मृत्यूपश्चात पालिकेकडून मिळलेली देयके संपल्यांने आज ना उद्या नोकरी मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांच्या घरात खायचे काय, कुटुंबियांच्या गरजा भागवायच्या कशा, हा गंभीर प्रश्न उभा आहे. यापैकी काही जण नोकरीची प्रतीक्षा करतच मयत झाले आहेत तर अनेकजण शासकीय नियमानुसार वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तरी याबाबत प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष घालून आता तरी या अनुकंपाधारकांचा वनवास थांबवावा अशी मागणी होत आहे.
अनुकंपाखालील 25 उमेदवारांना न्याय
काही महिन्यांपूर्वी शासनाने जिह्यातील नगरपालिकांमध्ये अनुकंपा सूचीतील 25 उमेदवारांना नेमणुकीचे पत्र दिले आहे. सध्या हे उमेदवार जिह्यातील काही नगरपालिकांमध्ये कार्यरत झाले असून त्यांना योग्य न्याय मिळाला आहे. पण त्यानंतरही अनेक अनुकंपाधारक हे नोकरीच्या प्रतिक्षेतच आहेत. सध्या शासनाने विशेष बाब म्हणून आस्थापना खर्चाची अट शिथील करत इचलकरंजी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर केल्याने 1744 पदांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अनुकंपाधारकांची प्रतीक्षा कायमस्वरूपी संपवण्याची संधी निर्माण झालेली आहे.
अनुकंपाधारकांचे नोकरीसाठी दुर्देवाचे फेरे
इचलकरंजी नगरपालिकेतील एका मयत कर्मचाऱ्याच्या मुलाचे नाव अनुकंपाखालील नोकरी मिळण्यासाठी 2005 साली सुचित समाविष्ट झाले. अनेक वर्षे प्रतीक्षा करूनही त्या मुलास नोकरी मिळली नाही. अखेर नोकरीच्या प्रतीक्षेतच तो मुलगा मयत झाला. आता नियमानुसार त्या मुलाच्या पत्नीचे म्हणजेच मृत कर्मचाऱ्याच्या सुनेचे नाव सुचीत समाविष्ट झाले आहे. पण अजूनही त्यांना नोकरी मिळाली नसल्याने दुर्देवाचे फेरे संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









