जुन्या तलावाच्या स्वच्छतेचे काम पूर्ण : नव्या कपिलतीर्थ तलावातील पाण्याचा उपसा सुरू : दुर्गामाता विसर्जनासाठी पाणी भरणार
बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जनानंतर आता महानगरपालिकेकडून कपिलेश्वर जुन्या आणि नव्या तलावाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या तलावातील पाणी व मूर्तींचे अवशेष काढून तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. तर मंगळवारपासून नव्या कपिलेश्वर तलावातील पाणी उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवरात्रीनंतर सदर तलावात दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे महापालिकेकडून तातडीने तलावांच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. कपिलेश्वर जुन्या आणि नव्या तलावात दरवर्षी घरगुती तसेच सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यासह नवीन पाणी सोडण्यात आले होते. विसर्जन काळात श्रीमूर्तींचे व्यवस्थितरित्या विसर्जन व्हावे यासाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली होती. दोन्ही तलावात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
बहुतांश श्रीमूर्तीं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने त्या विरघळण्यासाठी विलंब लागतो. विसर्जन करण्यात आलेल्या 10 दिवसानंतर तलाव स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी जुन्या तलावातील पाणी काढण्यासह श्रीमूर्तींचे अवशेष बाहेर काढून तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. पण त्यामध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. तर नव्या तलावातील पाणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पाणी काढण्यात आल्यानंतर श्रीमूर्तींचे अवशेष काढून तलाव स्वच्छ केला जाणार आहे. शहर व उपनगरात नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. घटस्थापनेदिवशी प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर विजयादशमीला दुर्गामाता मूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावाकडे नेल्या जातात. त्यामुळे यंदाही नवीन तलावाची स्वच्छता झाल्यानंतर दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाणी भरले जाणार आहे.









