शहर-उपनगरात भटक्या गायींसह मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली
बेळगाव : शहर आणि उपनगरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून त्याचा नाहक त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने सोमवार दि. 13 रोजी नरगुंदकर भावे चौकात फिरणारी पाच जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत केली. मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चलली आहे. तसेच कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. पण महापालिकेकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले वाढत चालले आहेत. विविध ठिकाणी लहान मुलांचे चावे घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. परिणामी बेळगावकरांना कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरण्याची वेळ आली आहे.
वाहतुकीवर परिणाम
त्यातच मोकाट जनावरांची समस्याही कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम थंडावली आहे. मोकाट गायी रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. रहदारी पोलिसांनाच मोकाट जनावरांना बाजूला करण्याची वेळ आली. बाजारपेठेसह कचराकुंडीच्या आवारात जनावरांचा वावर वाढला असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त शुभा बी. बाजारपेठेत फेरफटका मारत असताना नरगुंदकर भावे चौकात एक गाय अत्यवस्थ होऊन पडली होती. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मनपाच्या आरोग्य निरीक्षकांना माहिती दिली. निरीक्षकांनी महापालिकेचे पशुगणती निरीक्षक राजू संकण्णावर यांना माहिती देऊन जनावरांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिकेचे पथक नरगुंदकर भावे चौकात दाखल झाले. त्या ठिकाणच्या अत्यवस्थ गायीसह एकूण पाच जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली.









