बेळगाव : शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून सुरू झाली आहे. गुरुवारी नरगुंदकर भावे चौकात फिरणारी तीन मोकाट जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत करण्यात आली. शहरात मोकाट जनावरे सोडण्यात येऊ नयेत, अशी सूचना जनावर मालकांना करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, मोकाट जनावरे शहर व उपनगरात अद्यापही सोडली जात आहेत. सदर जनावरांचे कळप शहरातील मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसण्यासह बाजारपेठेत मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे याचा फटका भाजीविक्रेते त्याचबरोबर इतर व्यावसायिकांना बसत आहे. काही ठिकाणी जनावरे उधळून नागरिकांवर हल्ले करत आहेत. महापालिका आयुक्तांनी देखील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना यापूर्वी देखील अनेक वेळा केली आहे.
मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र
मध्यंतरी मोकाट जनावरे पकडून त्यांना गो-शाळेत हलविण्यात येत होते. पण ही कारवाई अलीकडे थंडावली आहे. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी नरगुंदकर भावे चौकातील तीन मोकाट जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत केली.









