प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : गुरुवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना लोकायुक्तांकडून भेटी
बेळगाव : बुधवारपासून बेळगाव दौऱ्यावर आलेल्या बेंगळूर येथील लोकायुक्त न्यायमूर्ती व अधिकाऱ्यांकडून बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सरकारी कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली जात आहे. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जात असून गुरुवारी दुसऱ्या दिवशीही हुक्केरी, गोकाक, सौंदत्ती, बैलहोंगल, खानापूर तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांना भेटी देण्यात आल्या. तर शहरातील मुख्य महानगरपालिका कार्यालय, बुडा कार्यालय आणि स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला लोकायुक्त न्यायमूर्ती राजशेखर व शुभवीर जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत भेट देऊन विविध कागदपत्रांची तपासणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
सरकारच्या सूचनेनुसार बेंगळूर लोकायुक्त न्यायमूर्ती आणि अधिकारी दोन दिवस बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. अधिकारी येथील शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास असून पहिल्या दिवशी बुधवारी शहर व जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. गुरुवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लोकायुक्त न्यायमूर्ती रवाना झाले. तेथील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. प्रलंबित असलेल्या कामांबाबत विचारणा करत सदर कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली. तसेच विविध कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडूनही त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
गुरुवारी महानगरपालिका, बुडा कार्यालय व स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला सकाळपासून दुपारपर्यंत अधिकाऱ्यांनी भेट देऊन झाडाझडती घेतली. महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल, नगररचनासह विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. दोन दिवस लोकायुक्त न्यायमूर्ती व अधिकारी बेळगाव दौऱ्यावर आल्याने अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. कारवाईच्या भीतीने प्रलंबित अनेक कामे दोन दिवसांपूर्वीच हातावेगळी केली आहेत.
महापालिका, बुडा व स्मार्ट सिटी कार्यालयांच्या भेटीवेळी लोकायुक्त न्यायमूर्ती राजशेखर, न्यायमूर्ती शुभवीर जैन, बेळगाव लोकायुक्तचे निरीक्षक निरंजन पाटील व इतर अधिकारी-सहकारी या कारवाईत सहभागी झाले होते. गुरुवारी बेळगाव जिल्ह्याचा दोन दिवशीय दौरा संपला असल्याने शुक्रवारी लोकायुक्त न्यायमूर्ती व अधिकारी बागलकोटला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्याकडून बेळगावात पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.









