15 जूननंतर नव्या ठेकेदारांकडून शहरातील कचऱ्याची उचल होण्याची शक्यता
बेळगाव : बेळगाव शहरातील सर्व 58 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका अखेर बेंगळूर येथील गणेश शंकर एन्व्हायरनमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. सदर कंपनीने 29 कोटी 33 लाख रुपयांना हा ठेका घेतला असून ठेकेदारांकडून महापालिकेला ठेक्याच्या रकमेपैकी 5 टक्के सुरक्षा अनामत रक्कम भरायची आहे. सदर रक्कम भरल्यानंतर ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली जाणार असून 15 जूननंतर नवीन ठेकेदारांकडून 58 प्रभागांमधील कचऱ्याची उचल होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका 2015 पासून 9 ठेकेदारांकडे आहे. त्या सर्वांची मुदत 2016 मध्ये संपली असून, नव्या ठेकेदारांची नियुक्ती न झाल्याने महानगरपालिकेकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. महानगरपालिकेला 2022 मध्ये शहर स्वच्छता करण्यासाठी बीव्हीजी कंपनी हा नवा ठेकेदार मिळाला. शहापूर येथून 6 फेब्रुवारी 2023 रोजी कामाचा शुभारंभदेखील झाला. मात्र कंपनीने महापालिकेकडे सुरक्षा अनामत रक्कम जमा केली नाही. त्यांना स्मरणपत्र देऊन देखील कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेकडून सदर कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला होता.
कचरा उचल व्यवस्थित हाण्याची अपेक्षा
यानंतर नव्या ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी महानगरपालिकेने निविदा काढली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. महानगरपालिकेने 2025 मध्ये काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला असून बेंगळूर येथील गणेश शंकर कंपनीला शहरातील 28 प्रभागामधील कचऱ्याची उचल करण्याचा ठेका देण्यात आला आहे. याला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नव्या ठेकेदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील 47 प्रभागांची स्वच्छता 9 ठेकेदारांकडून केली जात होती. मात्र कचऱ्याची उचल व्यवस्थित होत नाही. सफाई कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नाही, अशा अनेक तक्रारी केल्या जात होत्या. मात्र आता मनपाला नवा ठेकेदार मिळाला असल्याने कचऱ्याची उचल व्यवस्थितरित्या होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनामत रक्कम आल्यानंतर मनपाकडून वर्क ऑर्डर
नव्या ठेकेदाराकडून महापालिकेला अद्याप सुरक्षा अनामत रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे अनामत रक्कम ठेवण्यात आल्यानंतर मनपाकडून वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या 15 जूनपासून नव्या ठेकेदारांकडून कचऱ्याची उचल होण्याची शक्यता आहे.









