यापूर्वी आंदोलन छेडूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बेळगाव : राज्यातील महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 27 मे पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्याआधी आपल्या मागण्या मान्य कराव्यात नहून संपावर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्नाटक राज्य पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी धरणे धरले. जिल्हा नगरविकास कोषच्या संचालकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून 27 मार्च 2025 रोजी मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालिका प्रशासनमंत्री रहिम खान यांच्या बिदर येथील निवासस्थानासमोर धरणे धरण्यात आले होते. रमजाननंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बैठक घेण्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली होती.
मात्र, अद्याप मागण्यांच्या पूर्ततेसाठी हालचाली केल्या नाहीत. 26 मे 2025 रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक दिवस लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याआधी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कर्नाटक नागरी सेवा नियम 1978 अधिनियम पालिका कर्मचाऱ्यांनाही लागू व्हावा. पंचायत राज विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच पालिका कर्मचारीही सरकारी नोकर म्हणून गणले जावेत आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुंडाप्पा रंगण्णावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









