सायंकाळी जमलेल्या कचऱ्याची रात्रीच उचल करण्याचे कामगारांना आवाहन
बेळगाव : महापालिका आयुक्त पुन्हा पहाटेच्या फेरीला जात असून, विविध ठिकाणी ते भेटी देत आहेत. सोमवारी सकाळीच सदाशिवनगर येथील वाहन गोडाऊननंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथेही भेट दिली. त्यावेळी तेथील समस्या जाणून घेऊन या समस्या दूर करण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोतवाल गल्ली, गणपत गल्ली, रविवारपेठ येथील भाजीमार्केटजवळ जाऊन पाहणी केली. सायंकाळी जमलेल्या कचऱ्याची रात्रीच उचल करा, असे त्यांनी सांगितले. शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक यांच्या सहकार्यातून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्याभरापासून विविध ठिकाणी पाहणी करून त्यांनी कामगारांना देखील सूचना केल्या आहेत. शहरातील ब्लॅकस्पॉट दूर झाले पाहिजेत. तेव्हाच शहर स्वच्छ होईल. यासाठी रात्रीच्यावेळीच कचऱ्याची उचल करा, असे आरोग्य निरीक्षकांना सूचना केली आहे.
व्यापारी वर्गानेही सहकार्य करण्याची गरज
सदाशिवनगर येथील गोडाऊनला जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रविवारपेठ येथील बाजारपेठ येथेही त्यांनी पाहणी करून आरोग्य निरीक्षकांना सूचना केल्या आहेत. व्यापारी वर्गानेही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रात्रीच्यावेळी कचऱ्याची वाहने सुरू करण्यात आली आहेत. तेव्हा रात्रीच तो कचरा संबंधित वाहनाकडे द्यावा, असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
उद्योजक-हॉटेल चालकांना सक्त ताकीद
औद्योगिक क्षेत्रातील कचरा तसेच हॉटेलमधील कचरा रात्रीच घंटागाडीकडे द्यावा. तो देत असताना वर्गीकरण करून द्यावा. कचरा घंटागाडीला न देता कोठेही फेकताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी हा इशारा दिला असून सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.









