खाद्यपदार्थांचा दर्जा वाढविण्याची सूचना, गोशाळेचीही केली पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी हे पहाटेच शहराचा फेरफटका मारत आहेत. कचऱ्याची उचल यासह इतर समस्यांबाबत त्यांनी गांभीर्याने घेतले आहे. शनिवारी त्यांनी चक्क इंदिरा कँटीनला भेट देऊन तेथील नाश्त्याची चव घेतली. यावेळी त्यांनी कँटीनचालकाला दर्जा चांगला ठेवण्याची सूचना केली.
आझमनगर येथील बिट कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी इंदिरा कँटीनला भेट देऊन तेथे नाश्ता केला. यावेळी त्यांनी कँटीन स्वच्छ ठेवा, याचबरोबर नाश्त्याचा दर्जाही राखा, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. प्रभाग क्र. 34 चे नगरसेवक श्रेयस नाकाडी यांना घेऊन आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर परिसरातील कचरा कुंडींची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा उचलण्याची सूचना मनपा कर्मचाऱ्यांना केली.
रस्त्यावर कचरा टाकत असतील तर त्यांना नोटीस द्या, अशी सक्त ताकीद यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. हॉटेलमालकांनीही स्वच्छता राखावी, कचरा रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी न फेकता घंटागाडीकडेच द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. स्वत:पासून शहर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीनगर येथील गोशाळेला भेट
श्रीनगर येथील गोशाळेला त्यांनी भेट दिली. पशुवैद्यकीय निरीक्षकांकडून माहिती घेतली. गोशाळा परिसर स्वच्छ ठेवावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीनगर येथील उद्यानालाही भेट दिली. त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी आराखडा तयार करा, असे अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले. आरओ प्लांट बंद स्थितीत आढळल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्त करावेत, असे स्पष्ट केले.
शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता यापुढे कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी देखील पाऊल उचलण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांनी प्रयत्न करावेत. जेणेकरून शहरात कचराच आढळणार नाही. शहरामध्ये दोनवेळा कचरा जमा करण्यासाठी वाहने पाठविण्यात येत आहेत. तरीदेखील कचरा जनता रस्त्यावर फेकत आहे, हे दुर्दैवी असून जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









