138 सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आयुक्तांचे उत्तर
बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मागील बैठकीत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला होता. त्यावरून जोरदार खडाजंगी झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावेळी सत्ताधारी गटाने आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर विरोधी गटानेही जोरदार आवाज उठविला होता. 138 कामगार नियुक्ती बेकायदेशीर असून लोकायुक्तांकडे याची चौकशी करण्यासाठी सोपविले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मागील बैठकीत दिले होते. मात्र बैठकीत त्यांनी या मुद्द्यावरून घुमजाव केला आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांनी, 138 सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन अजूनही देण्यात आले नाही. केवळ तीन महिन्यांचे वेतन दिले आहे. मात्र त्यापूर्वीचे वेतन दिले नाही, असा आरोप सभागृहात केला. आयुक्तांनी त्यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्याबाबत चौकशी करण्यासाठी लोकायुक्ताकडे पाठपुरावा करू, असे सांगितल्याचे रवी साळुंखे यांनी स्पष्ट केले. त्यावर महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अशाप्रकारे मी सभागृहात बोललोच नाही, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने या सर्वांची नियुक्ती करण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यानुसार 138 कामगारांची नियुक्ती केली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यावेळी या प्रश्नावर मोठी खडाजंगी झाली होती. महापालिका आयुक्तांनी मात्र या प्रश्नावरून घुमजाव केल्याचे दिसून आले.
अगरबत्ती प्रकल्पाबाबत पुन्हा सभागृहाची दिशाभूल
फुल मार्केटमध्ये महापालिकेच्यावतीने अगरबत्ती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी शेड उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. मात्र त्यानंतर ते बंद होते. याबाबत वृत्तपत्रातून बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तो प्रकल्प सुरू केला. याबाबत रवी साळुंखे यांनी त्यामधून आतापर्यंत किती उत्पन्न झाले, याची माहिती विचारली. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप उत्पन्न नाही. मात्र सफाई कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाल्याचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी सांगितले. सभागृहामध्ये पुन्हा एकदा दिशाभूल त्यांनी केल्याचे दिसून आले.









