सफाई कंत्राटदार वाय. बी. गोल्लर यांची याचना : आरोग्य स्थायी चेअरमन-अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रामाणिकपणे महापालिकेचा सफाई कंत्राटदार म्हणून काम करत आहे. शहरातील काही भागातील कचऱ्याची उचल करण्याचे काम आम्ही करत आहोत असे असताना आता आम्हाला आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष आणि कमिटीकडून मानसिक त्रास करण्यात येत असून तो थांबवा. मला न्याय द्या, अशी याचना सफाई कंत्राटदार वाय. बी. गोल्लर यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली आहे. सध्या शहरातील कचरा उचल करण्याचे काम योग्य प्रकारे सुरू आहे. आपल्याकडे काम करत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन मी वेळेत देत आहे. मात्र, महापालिकेमध्ये बेकायदेशीररीत्या 138 कामगारांना नियुक्त करण्यात आले. त्यांचे वेतन मी कंत्राटदाराने द्यावे, असा दबाव घालून आम्हाला मानसिक त्रास दिला जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
नव्याने बेकायदेशीर नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांना आम्ही वेतन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचबरोबर मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडून आम्हाला कोणत्याच प्रकारची सूचना किंवा आदेश देण्यात आला नाही. तेव्हा आम्ही या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही वेतन देत नाही म्हणून नुकत्याच झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीला आम्हाला बोलावून घेऊन त्यामध्ये आमचा अवमान केल्याचेही म्हटले आहे. आरोग्य स्थायी कमिटीचे चेअरमन रवी धोत्रे, महापालिका पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी हे आमच्यावर दबाव घालत असल्याचेही म्हटले आहे.









