प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्तपदी पी. एस. लोकेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी राज्य सरकारने आदेश काढला होता. पी. एस. लोकेश यांनी शनिवारी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी त्यांचे स्वागत केले.
महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली झाली होती. त्यानंतर हंगामी आयुक्त म्हणून राजश्री जैनापूर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर पी. एस. लोकेश यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी आयुक्त लोकेश म्हणाले, शहरातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज केले जाईल, असे सांगितले.
सध्या त्यांच्यासमोर पाणी टंचाईची समस्या आहे. ती समस्याही योग्य प्रकारे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सत्कारप्रसंगी आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









