प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतूनाशक औषधांची फवारणी करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, तसेच महानगरपालिकेने पुरेशा शववाहिका खरेदी कराव्यात, अशा मागण्या भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केल्या आहेत.
जाधव यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व शहरातील समस्यांबाबत चर्चा केली. शहरातील अस्वच्छता आणि गढूळ वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यु, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार वाढत आहे. म्हणून महानगरपालिकेने फॉग मशीनचा वापर करून जंतूनाशक औषधांची फवारणी शहर व परिसरात करावी, बंद पडलेली आरोग्य केंद्रे पूर्ववत सुरू करून लोकांना आरोग्य सेवा द्यावी तसेच शववाहिका खरेदी कराव्यात, अशी मागणी केली. जर शववाहिका खरेदी करण्यास आर्थिकदृष्ट्या अडचणीचे असेल तर महानगरपालिकेने सेवाभावी संस्थांना आवाहन करून मिळालेल्या देणगीतून शववाहिका खरेदी कराव्यात, असेही ते म्हणाले. आयुक्तांनी याबाबत आपण पाहणी करून या समस्यांचे निराकरण करू, अशी ग्वाही दिली.