आयुक्त कक्षातील चर्चेचे वृत्तांकन करण्यास आक्षेप : आयुक्तांच्या कारभाराबद्दल संशय
बेळगाव : शहरातील विविध समस्यांचे निवारण करण्याच्या मागणीचे निवेदन देण्याबाबतचे वृत्तांकन करण्यास महापालिका आयुक्तांकडून आक्षेप घेतला जात आहे. वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधी व छायाचित्रकारांना कक्षामधून बाहेर जाण्याची सूचना आयुक्त रुद्रेश घाळी करीत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांना प्रसिद्धी माध्यमांचे वावडे झाले आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र याची दखल घेण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत दररोज असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र महापालिका आयुक्तांकडून नागरिकांची केवळ बोळवण केली जात आहे. नगरसेवकांनीही समस्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देत नसल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत. काही ठराविक नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे. तसेच समस्यांबाबत तक्रारी करण्यास आलेल्या नागरिकांशी उद्धट बोलण्याचा प्रकारही वाढला आहे.
शहरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी नागरिक महापालिकेकडे निवेदन सादर करतात. याबाबतचे वृत्तांकन वृत्तपत्र, प्रसार माध्यमे करीत असतात. मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आयुक्त कक्षात जाण्यास महापालिका आयुक्तांचे स्वीय साहाय्यक आक्षेप घेत आहेत. तसेच छायाचित्र घेण्यास छायाचित्रकारांना मज्जाव करून कक्षाबाहेर जाण्याची सूचना आयुक्त वेळोवेळी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांबाबत वृत्तांकन करण्याचा अधिकार प्रसार माध्यमांना नाही का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त प्रसार माध्यमांच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. पारदर्शी कारभार करण्यासाठी सभागृहात तसेच महापालिका कार्यालयात घडणारी माहिती व घेतले जाणारे निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे काम प्रसार माध्यमे करीत असतात. पण कार्यालयातील कारभाराची माहिती लपविण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना प्रसिद्धी माध्यमांचे वावडे झाले आहे का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
कंत्राटदाराच्या सल्ल्यानुसार चालतोय कारभार
एका कंत्राटदाराच्या सल्ल्यानुसार महापालिका आयुक्त कार्यालयाचा कारभार सांभाळत असल्याच्या चर्चादेखील ऐकावयास मिळत आहेत. तसेच काही अनधिकृत कामे किंवा बिले मंजुरीसाठी संबंधित कंत्राटदारासोबतच व्यवहार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









