काम अंतिम टप्प्यात, हस्तांतरास विलंब, लाभार्थ्यांतून नाराजी
बेळगाव : मनपाच्या कायमस्वरुपी सफाई कर्मचाऱ्यांना (पीके) गृहभाग्य योजनेंतर्गत घरे बांधण्यात आली आहेत. काम अंतिम टप्प्यात आले असले तरी हस्तांतराला विलंब झाल्याने लाभार्थी कामगारांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सफाई कर्मचारी घरकुलाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. गृहभाग्य योजनेंतर्गत एपीएमसी रोड, नेहरुनगर तिसरा क्रॉस येथे जी+3 प्रकारची घरे बांधण्यात आली आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ विद्युत काम शिल्लक राहिले असल्याने हस्तांतर रखडले आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या कामाला कोरोना, निवडणूक आणि इतर कारणांमुळे विलंब झाला आहे.
मनपाच्या कायमस्वरुपी सफाई कर्मचाऱ्यांना (पीके) 48 घरे बांधण्यात आली आहेत. या इमारतीच्या शेजारीच असलेल्या 119 घरांच्या बांधकामाला विलंब झाला आहे. दरम्यान 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतरदेखील अद्याप काम शिल्लक राहिले आहे. सध्या कामगार तात्पुरते शेड उभारून झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्याने कामगार निराश झाले आहेत. गृहभाग्य योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकारकडून 20 टक्के तर राज्य सरकारकडून 80 टक्के अनुदान मंजूर झाले आहे. प्रत्येक कुटुंबास 550 चौरस मीटर घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये एक हॉल, एक बेडरूम, एक किचन, शौचालयाची व्यवस्था असणार आहे. शिवाय याठिकाणी 24 तास पाणी आणि पार्किंगची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. हस्तांतरास विलंब होत असल्याने नाराजी आहे.









