महापालिकेत खळबळ : खाबुगिरी पुन्हा चव्हाट्यावर
सांगली प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना सव्वा लाखांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. विजय आनंदराव पवार (वय 50 रा. जोशी प्लॉट, संभाजीनगर, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी शहरातील टिंबर एरिया परिसरातील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली.
शहरातील एका कंपनीमार्फत बसविण्यात आलेल्या फायरफायटींग यंत्रणेच्या कामाचा अंतिम दाखला देण्यासाठी पवार यांनी लाचेची मागणी केली होती. दरम्यान पवार यांच्यावरील कारवाईने महापालिकेत खळबळ माजली आहे. महापालिकेतील खाबुगिरी या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे काम करतात. त्यांच्या कंपनीमार्फत शहरात एका ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली होती. त्याचा अंतिम दाखला मिळण्यासाठी त्यांनी अग्निशमन विभागाकडे रितसर अर्ज केला होता. यासाठी मुख्य अग्निशमन अधिकरी पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाख ऊपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अंतिम दाखला देणार नाही. याशिवाय यापुढील कामांचेही दाखले मिळणार नाहीत, असे पवार यांनी तक्रारदार यांना बजावले होते.
याबाबत तक्रारदार यांनी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. यामध्ये पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान तक्रारदार व पवार यांच्यामध्ये सव्वा लाखांची तडजोड झाली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अग्निशमनच्या टिंबर एरिया येथील कार्यालयात सापळा लावला. मंगळवारी सायंकाळी पवार यांना लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पवार लाच घेताना जेरबंद झाल्याची बातमी कळताच महापालिकेत खळबळ माजली. या निमित्ताने महापालिकेतील खाबुगिरीही चव्हाट्यावर आली आहे. या कारवाईत पोलिस उपअधिक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, कर्मचारी अजित पाटील, सलीम मकानदार, सीमा माने, उमेश जाधव, सुदर्शन पाटील आदींनी सहभाग घेतला.
महापालिकेतील खाबुगिरी चव्हाट्यावर
महापालिकेतील काही विभाग प्रमुखांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. यापूर्वीही दोन वेळा महापालिकेत लाच प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. तरीही काही अधिकाऱ्यांच्या ‘स्वभावा’त बदल झाला नाही. यात आता मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांची भर पडली.







