गृहमंत्री जी. परमेश्वर यांचे प्रतिपादन : सिद्धसेन मुनी महाराजांची घेतली भेट : समर्थपणे प्रकरणाची चौकशी सुरू
बेळगाव : हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे संस्थापक आचार्य 108 कामकुमार नंदी मुनींच्या हत्या प्रकरणाचा बेळगाव जिल्हा पोलीस समर्थपणे तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची गरज नाही, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी गृहमंत्री बेळगावला आले होते. हलगा येथील बालाचार्य 108 सिद्धसेन मुनी महाराजांची भेट घेऊन गृहमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पहिल्या दिवसापासून पोलीस समर्थपणे प्रकरणाची चौकशी करीत आहेत. या प्रकरणाने आम्हालाही धक्का बसला आहे, असे त्यांनी सांगितले. मुनी महाराजांच्या हत्येने जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. साधूसंतांचीच अशी भीषण हत्या झाली तर सामान्यांचे काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जैन मुनींनी सुरक्षेची मागणी केली आहे. जैन समाज व साधूसंतांसमवेत सरकार सदैव असणार आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. या घटनेनंतर केवळ काही तासांतच पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे, असे सांगत डॉ. जी. परमेश्वर यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पत्रकारांशी बोलण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी सिद्धसेन मुनी महाराजांशी चर्चा केली. कर्नाटकात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने आवश्यक खबरदारी घ्यावी. जैन मुनींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही गृहमंत्र्यांकडे महाराजांनी केली.
भाजपने या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये
भाजपने या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये. केवळ दीड महिन्यापूर्वी कर्नाटक पोलीस यांच्यासाठी चांगले होते. दीड महिन्यात त्यांच्यावर अविश्वास कसा दाखविता, असा प्रश्न उपस्थित करून मारेकऱ्यांना अटक झाली आहे. हत्येचे कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. जैन समाजाला संरक्षण पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.









