तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात : अखेर तरण्याने बळीराजाला तारले; शेतकऱ्यांत समाधान
वार्ताहर /किणये
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे खरीप हंगामातील भातरोप लागवड व राताळी लागवडीची कामे खोळंबली होती. यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तरण्या पावसाने बळीराजाला तारले असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या संतधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये, संतिबस्तवाड परिसरातील मुंगेत्री नदी प्रवाहित झाली आहे. यामुळे या भागातील शेतकरीवर्ग सुखावला आहे.
यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले. दि. 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राच्या काळात तालुक्याच्या काही भागात पावसाची केवळ रिमझिम झाली. आणि शेतकऱ्यांना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच करावी लागली. यंदा खरीप हंगाम साधायचा कसा, याची चिंता सर्व शेतकऱ्यांना लागून राहिली होती. दि. 6 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली. नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. या पुनर्वसू नक्षत्राच्या तरण्या पावसाने अखेर काही भागात सोमवारी रात्री तर तालुक्याच्या सर्रास भागात मंगळवारी सकाळपासून जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या सर्रास भागातील नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. तसेच शेतशिवारामध्ये पाणी साचू लागले आहे. शिवारामध्ये पाणी साचत असल्यामुळे आता भातरोप लागवड करण्यासाठी चिखल व मशागत करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
भातरोप लागवड करण्यासाठी भातरोपे सज्ज झाली आहेत. मात्र गेल्या बऱ्याच दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ही भातरोप लागवड खोळंबली होती. आता मुसळधार पाऊस होत असल्याने बुधवारपासून तालुक्याच्या बहुतांशी भागात भातरोप लागवडीची धांदल दिसून येणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, येळेबैल, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, बामणवाडी, वाघवडे, कर्ले, बहाद्दरवाडी, झाडशहापूर आदी भागात यंदा रताळी बांध (मेरा)मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या आहेत. पण 50 टक्के शेतकऱ्यांनी रताळी वेल लागवड केलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी रताळी वेल लागवडीची कामे लांबणीवर पडली होती. आता या रताळी लागवडीलाही जोर येणार असल्याची माहिती रताळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. मंगळवारी सकाळपासूनच तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले तर हवामानात गारवा निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या.
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये पावसाचा जोर वाढला
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये पावसाचा जोर वाढला असून हा पाऊस भात पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा आदी गावातील भात पिकांच्या उगवणीसाठी पावसाची नितांत गरज होती. सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्याच्या पूर्वभागामध्ये यंदा म्हणावा तसा पाऊसच झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले होते. तसेच पावसाअभावी भात पिकांची उगवणदेखील थांबली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोमवारपासून सुरू झालेला पाऊस हा सर्वच पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसाने शेतातील सर्व कामे ठप्प झाली होती. तर नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने अनेक गावातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. या पावसाने भूजल पातळीही वाढण्यास मदत होणार आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.









