वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक मुनाफ पटेलला शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल स्पर्धा आयोजकांनी दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे मुनाफ पटेलला मिळणाऱ्या मानधन रक्कमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. या स्पर्धेतील बुधवारी येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात सामना अधिकाऱ्याशी मुनाफने हुज्जत घातल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी मुनाफ पटेलची नियुक्ती करण्यात आली होती.









