चेन्नईवर मिळवला दिमाखात विजय : सामनावीर रोहितची 75 धावांची खेळी तर सूर्याचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही असेच काहीसे दिसून येत आहे. पहिल्या 5 सामन्यात फक्त 1 विजय मिळवणाऱ्या मुंबईने आता विजयाची हॅट्ट्रिक केली. वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईविरुद्ध सहज विजय मिळवताना मागील पराभवाचा बदला देखील घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला 177 धावा करता आल्या. यानंतर रोहित व सूर्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 15.4 षटकांतच विजय मिळवला.
हार्दिकने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि पण मुंबईकर आयुष म्हात्रेने यावेळी मैदान गाजवले. घरच्या मैदानात आयुषने पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 15 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 34 धावा केल्या. आयुष बाद झाला आणि चेन्नईची धावगती रोढावली. पण त्यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके करत संघाला 176 धावांपर्यंत पोहोचवले. स्टार फलंदाज रविंद्रला 5 धावा करता आल्या तर रशीद 19 धावा करुन बाद झाला. जडेजाने मात्र शानदार खेळी साकारताना 35 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या तर शिवम दुबेने 32 चेंडूत 50 धावांची खेळी साकारली. मुंबईकडून बुमराहने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
वानखेडेवर रोहितची दादागिरी
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व रिकेल्टन यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 63 धावांची भागीदारी केली. फटकेबाजीच्या प्रयत्नात रिकेल्टन 24 धावा करुन माघारी परतला. यानंतर मात्र वानखेडेवर रोहित व सूर्याची तुफानी फटकेबाजी पहायला मिळाली. दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेताना शतकी भागीदारी साकारली. रोहितने अवघ्या 45 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह नाबाद 76 धावा फटकावल्या. त्याचे हे यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले. याशिवाय, सूर्याने धमाकेदार खेळी साकारताना 30 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारासह नाबाद 68 धावांचे योगदान दिले. या जोडीने मुंबईला 15.4 षटकांत विजय मिळवून दिला. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने एक बळी घेतला.
चेन्नई आयपीएल बाहेर
मुंबईविरुद्ध पराभवामुळे चेन्नईला मोठा फटका बसला आहे, कारण प्लेआफमधून ते जवळपास बाहेर गेले आहेत. चेन्नईने 8 सामन्यांत फक्त 2 विजय मिळवले आहेत. आता जर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना पुढील सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. दुसरीकडे, मुंबईचा संघ 8 सामन्यात 8 गुण मिळवत सहाव्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 5 बाद 176 (रशीद 19, रचिन रविंद्र 5, आयुष म्हात्रे 32, रविंद्र जडेजा 35 चेंडूत नाबाद 53, शिवम दुबे 32 चेंडूत 50, एमएस धोनी 4, ओव्हर्टन 4, बुमराह 2 बळी, दीपक चहर, अश्वनी कुमार व सँटेनर प्रत्येकी एक बळी) मुंबई इंडियन्स 15.4 षटकांत 1 बाद 177 (रिकेल्टन 24, रोहित शर्मा 45 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह नाबाद 76, सुर्यकुमार यादव 30 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारासह नाबाद 68, जडेजा 1 बळी).









