दिग्गज असतानाही रणजी ट्रॉफीत दारुण पराभव : जम्मू संघाचा 5 गड्यांनी दणदणीत विजय : युद्धवीर सिंग सामनावीर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शिवम दुबे इतके मोठ्या खेळाडूंनी भरलेला संघ म्हणजे मुंबई. दिग्गज खेळाडूंचा भरणार असतानाही मुंबईच्या वाट्याला पराभव आला. जम्मू-काश्मीरने गतविजेत्या मुंबईचा रणजी ट्रॉफीत पराभव केला आहे. जम्मू कश्मीरचा युद्धवीर सिंह हा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. मुंबईसाठी शार्दुल ठाकूर गेमचेंजर ठरला परंतू त्याला इतर फलंदाजाची साथ मिळाली नाही. दरम्यान, गटात जम्मू काश्मीरचा संघ 27 गुणासह अव्वलस्थानी असून मुंबईचा संघ 22 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईचा संघ पहिल्या डावात 120 धावांवर सर्वबाद झाला होता. यादरम्यान रोहित 3, यशस्वी जैस्वाल 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. रहाणे 12 धावा करून बाद झाला तर अय्यर केवळ 11 धावा करता आल्या. शार्दुल ठाकूरने 51 धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात, शुभम खजुरियाच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरने मुंबईवर 86 धावांची आघाडी घेतली.
शार्दुलचे शतक मात्र इतर मुंबईकर फलंदाज ठरले फ्लॉप
दुसऱ्या डावात मुंबई संघाची हालत खराब होती, पण शार्दुल ठाकूरने 119 धावांची शानदार खेळी केली आणि तनुष कोटियनने 62 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. मुंबईच्या दुसऱ्या डावातही रोहितसह जैस्वाल, रहाणे, अय्यरला चमक दाखवता आली नाही.
मुंबईचा संघ ऑलआऊट झाल्यानंतर जम्मू संघाला विजयासाठी 205 धावांचे टार्गेट मिळाले. प्रत्युत्तरादाखल, जम्मू आणि काश्मीरने 5 गडी गमावत 207 धावा करताना हा सामना जिंकला. सलामीवीर शुभम खजुरियाने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले. विवरांत शर्माने 38 तर आबिद मुश्ताकने 32 धावांची खेळी खेळली. पारस डोग्राने 15 धावांचे योगदान दिले. जम्मू संघाने 49 व्या षटकात विजय मिळवत गटात अव्वलस्थान मिळवले आहे. मुंबईकडून शम्स मुलाणीने सर्वाधिक 4 गडी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव 120 व दुसरा डाव 290
जम्मू व काश्मीर पहिला डाव 206 व दुसरा डाव 49 षटकांत 5 बाद 207 (शुभम खजुरिया 45, विवरांत शर्मा 38, आबिद मुश्ताक 32, शम्स मुलाणी 4 बळी, मोहित अवस्थी 1 बळी).
जम्मूकडून सलग दुसऱ्यांदा मुंबईवर मात
विशेष म्हणजे, तब्बल 11 वर्षानंतर जम्मू संघाने मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची किमया केली आहे. याआधी 2014 मध्ये जम्मू संघाने मुंबईला 4 विकेट्सनी नमवले होते. जम्मू आणि काश्मीर संघाविरुद्ध मुंबई हरली त्या संघात राष्ट्रीय जर्सी घातलेला एकही खेळाडू नव्हता परंतु या संघात शौर्याची ढाल होती, त्यांच्या लढवय्या बाण्याने त्यांनी मुंबईसारख्या दिग्गज संघाला पराभूत केले.
कर्नाटकचा पंजाबवर डावाने विजय
रणजी ट्रॉफीतील अन्य एका सामन्यात पंजाबला कर्नाटकविरुद्ध 1 डाव व 207 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबचे नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलने दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी साकारली पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे पंजाबला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात पंजाबची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. संघ अवघ्या 55 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर कर्नाटकने पहिल्या डावात 475 धावा करत तब्बल 420 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी पार करुन पंजाबला मोठे लक्ष्य कर्नाटकसमोर ठेवण्याचे कठीण आव्हान होते, पण दुसऱ्या डावात देखील पंजाबच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. शुभमन गिलने सर्वाधिक 171 चेंडूत 102 धावा फटकावल्या. पंजाबचा संघ 213 धावांत सर्वबाद झाला व कर्नाटकने हा सामना डावाने जिंकला.









