वृत्तसंस्था/ मुंबई
सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने विजयी घोडदौड पुढे चालू ठेवताना गट अ मधील दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळविला. या सामन्यात मुंबईने मेघालयचा 9 गड्यांनी पराभव केला.
तुषार देशपांडे व डावखुरा स्पिनर शम्स मुलानी यांच्या भेदक माऱ्यासमोर मेघालयला 20 षटकांत 9 बाद 65 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सलामीवीर अंगकृश रघुवंशीने नाबाद 32 धावा फटकावत मुंबईचा सहज विजय साकार केला. जलद गोलंदाज तुषार देशपांडेने हरियाणाविरुद्ध पहिल्या सामन्यात (0-48) फारशी चमक दाखविली नव्हती. पण या सामन्यात त्याने 3 षटकांत 8 धावा देत 3 बळी टिपले. जानेवारी 22 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे रघुवंशीने सर्वाधिक धावा जमविल्या होत्या. येथे त्याने 31 चेंडूत 3 चौकार, एक षटकारासह नाबाद 32 धावा काढत मुंबईकडून कारकिर्दीला प्रभावी सुरुवात केली. यशस्वी जैस्वालकडूनही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने दोन सामन्यात 14 व 21 धावा जमविल्या आहेत. दोन सामन्यांत मुंबईचे 8 गुण झाले असून ते गटात आघाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक : मेघालय 20 षटकांत 9 बाद 65 (तुषार देशपांडे 3-8, शम्स मुलानी 2-6), मुंबई 9.4 षटकांत 1 बाद 66 (अंगकृश रघुवंशी नाबाद 32).









