रणजी ट्रॉफी : सामनावीर शम्स मुलानी चमकला: जम्मूचा संघ 35 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
येथील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडकातील सामन्यात मुंबईने जम्मू-काश्मीरवर 35 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा पहिलाच विजय ठरला आहे. मुंबईच्या विजयात शम्स मुलानीचा वाटा मोलाचा ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवत सामनावीर पुरस्कार पटकावला. या विजयासह मुंबईला सहा गुण मिळाले आहेत.
प्रारंभी, मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 386 धावा केल्या. मुंबईकडून सिद्धेश लाडने सर्वाधिक 116 धावा केल्या. शम्स मुलानीने शानदार फलंदाजी करताना 91 धावांचे योगदान दिले. या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 386 धावा केल्या. यानंतर फलंदाजी करताना जम्मू संघाचा पहिला डाव 325 धावांत आटोपला. कर्णधार पारस डोगराने सर्वाधिक 144 धावांची खेळी साकारली. इतर जम्मू संघाचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजासमोर अपयशी ठरले. यामुळे मुंबईला पहिल्या डावात 61 धावांची आघाडी मिळाली.
मुलानीचे 7 बळी
दुसऱ्या डावात मुंबईचा संघ मात्र सपशेल ढेपाळला. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. शम्स मुलानीने सर्वाधिक 41 धावा केल्या. मुंबईचा दुसरा डाव 56.5 षटकांत 181 धावांत आटोपला आणि जम्मू संघाला विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना शम्स मुलानीच्या भेदक माऱ्यासमोर जम्मू-काश्मीर संघाने सपशेल नांगी टाकली. कमरान इक्बालने अर्धशतकी खेळी साकारताना 56 धावा केल्या. अकीब नाबीने 29 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांचा डाव 207 धावांत आटोपला. मुंबईने हा सामना 35 धावांनी जिंकत यंदाच्या हंगामात विजयी सुरुवात केली. मुलानीने शानदार गोलंदाजी करताना 46 धावांत 7 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. 
शमीचा जलवा, बंगालची उत्तराखंडवर मात
कोलकाता : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत निवडकर्त्यांना आपली चमक दाखवून दिली आहे. उत्तराखंडविरुद्ध झालेल्या एलिट ग्रुप सी सामन्यात बंगालचे प्रतिनिधित्व करताना शमीने एकूण सात विकेट्स घेऊन आपल्या तंदुरुस्तीचा पुरावा दिला. ईडन गार्डन्सवर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगालने उत्तराखंडवर 8 विकेट्सनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, बंगालने हा सामना जिंकला, ज्यात शमीच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा होता. या सामन्यात त्याने एकूण 7 विकेट्स घेतल्या. पहिल्या डवात त्याने 37 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 38 धावांत 4 विकेट्स घेत विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात उत्तराखंडने पहिल्या डावात 213 धावा केल्या. यानंतर फलंदाजी करताना बंगालचा पहिला डाव 323 धावांत आटोपला. यामुळे बंगाल संघाला 110 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात उत्तराखंड संघाने 265 धावा केल्या. यामुळे बंगाल संघाला विजयासाठी 156 धावांचे टार्गेट मिळाले. हे टार्गेट त्यांनी अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला.









