म. ए. समिती बैठकीत निर्णय : भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी सीमावासियांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या असून इतर मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार मुंबई येथे होणारे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत देण्यात आली. मध्यवर्तीची बैठक मंगळवारी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष तारा भवाळकर यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव मांडला. तसेच महाराष्ट्र सरकारने शंभुराज देसाई व चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक केली, याबद्दल अभिनंदनाचे ठराव सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मांडले.
खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिल्ली येथे शरद पवार, अजित पवार, ज्येष्ठ वकील शिवाजीराव जाधव यांच्या भेटीचा तपशील स्पष्ट केला. तसेच तज्ञ समिती व उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याबाबत चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयात केस मेन्शन करण्यासाठी अॅड. वैद्यनाथन यांनी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म. ए. समितीच्या नेतेमंडळींना न भेटता निघून गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे भव्य इमारत उभारली जाणार आहे. याचे भूमिपूजन रविवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. बांधकाम समितीमध्ये हुतात्म्यांचे वारसदार, तसेच इतर सदस्य मिळून 51 जणांची कमिटी केली जाणार आहे. एकूण तीन मजले बांधकाम होणार असून सध्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले जाणार असल्याचे मनोहर किणेकर यांनी सांगितले. यावेळी रणजित चव्हाण-पाटील, पीयुष हावळ, रामचंद्र मोदगेकर, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, अॅड. एम. जी. पाटील व इतरांनी सूचना मांडल्या.
वेळ आल्यास योग्य प्रत्युत्तर देऊ
बाळेकुंद्री येथे प्रवासी आणि कंडक्टरमध्ये झालेल्या वादाला भाषिक रंग देण्यात आला. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या बससेवा ठप्प झाल्या. बेंगळूरमध्ये बसून कन्नड संघटनेचा अध्यक्ष वाटाळ नागराज व नारायणगौडा हे म. ए. समितीबद्दल गरळ ओकत आहेत. परंतु म. ए. समितीनेही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यास योग्य ते उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी घेणार भेट
काही दिवसांपूर्वी भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहआयुक्त बेळगावला आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार मराठी भाषिकांना न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. या बैठकीचा इतिवृत्त मिळवून अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता भेट घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.









