वृत्तसंस्था/ मुंबई
प्ले-ऑफमधील एकमेव उपलब्ध स्थानासाठी लढत चाललेली असताना मुंबई इंडियन्स आज बुधवारी येथे दिल्ली कॅपिटल्सशी संभाव्य निर्णायक लढतीत भिडतील. पाच वेळचा विजेता असलेला यजमान संघ सातत्य नसलेल्या पाहुण्यांचा विचार करता पुढे जाण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे.
सोमवारी सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सवर सहा गड्यांनी विजय मिळवल्याने लखनौची अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आता लढाई जुंपेल. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांनी बाद फेरीत स्थान मिळवले आहे. मुंबई इंडियन्सचे 14 गुण आणि दिल्ली कॅपिटल्सचे 13 गुण झालेले असून वानखेडे स्टेडियमवर यजमान संघाचे पारडे जड राहील. मुंबई जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील आणि अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघाच्या आवाक्याबाहेर ते जातील. दिल्ली कॅपिटल्सला पुढे जाण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचा शेवटचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.
जरी जवळजवळ पंधरा दिवसांपूर्वी गुजरात टायटन्सकडून निसटता पराभव स्वीकारावा लागलेला असला, तरी मुंबई इंडियन्सचा फॉर्म आणि अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना झुकते माप मिळत आहे. सलग सहा विजय मिळवून स्पर्धेतील सर्वांत शक्तिशाली संघांपैकी एक म्हणून उदयास आल्यानंतर ते घडले होते. विजयामुळे मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचेल, तर पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांचे भवितव्य 24 मे रोजी दिल्ली आणि पंजाब यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. त्यामुळे महेला जयवर्धने यांच्याकडून प्रशिक्षित संघ आपले सर्वोत्तम पाऊल आज पुढे टाकण्यास उत्सुक असेल.
यावेळी मुंबईचा सुपरस्टार रोहित शर्मा सर्वांचे लक्ष वेधून घेईल. कारण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हा त्याचा पहिलाच सामना आहे. हा अनुभवी फलंदाज आपल्या संघाला पुढे नेण्यास उत्सुक असेल. मुंबई त्यांच्या सध्याच्या संघरचनेचा पुरेपूर फायदा उठवू पाहेल, ज्यामध्ये रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश यांच्याकडे प्रमुख भूमिका आहेत. प्लेऑफपूर्वी हे दोन्ही दक्षिण आफ्रिकी खेळाडू राष्ट्रीय संघात सहभागी होण्यासाठी रवाना होतील.
आज सूर्यकुमार यादवही त्याचा उत्कृष्ट फॉर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, परंतु मुंबईला तिलक वर्माने त्याची लय पुन्हा मिळविलेली हवी आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने मागील पाचपैकी तीन सामन्यांत एक आकडी धावसंख्या नोंदविली आहे. मध्यंतरी पडलेल्या खंडामुळे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसह वेगवान गोलंदाजांना विश्रांती घेण्यासाठी आणि बरे होण्यासाठी काही अतिरिक्त वेळ मिळालेला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क (14 बळी) याने त्याच्या आयपीएल संघात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार्कची अनुपस्थिती ही भरून काढण्यास कठीण अशी मोठी पोकळी आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाशिवाय यशस्वी होण्यासाठी दिल्लीला इतर मार्ग शोधावे लागतील.
दिल्लीचा विचार करता के. एल. राहुलच्या (493 धावा) कामगिरीवर बरेच काही अवलंबून असेल. त्याने गुजरात टायटन्सविऊद्ध दमदार शतक झळकावले, तरीही त्यांना 10 गडी राखून पराभूत व्हावे लागले. स्टार्कच्या जागी आलेल्या मुस्तफिजूर रहमानने जोरदार पुनरागमन केले असले, तरी दिल्ली कॅपिटल्सच्या माऱ्यातील कमकुवतपणा त्यामुळे उघड झाला. कुलदीप यादवने (12 बळी) एका बाजूने नियंत्रण राखलेले आहे, परंतु कर्णधार पटेलसाठी हा हंगाम मोठ्या प्रमाणात निराशाजनक राहिला आहे.
संघ-मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंझ, रायन रिकल्टन, श्रीजित कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, रघू कुमार, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चहर, अश्वनी कुमार, रीस टोपली, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), मुस्तफिजुर रहमान, अभिषेक पोरेल, कऊण नायर, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नळकांडे, त्रिपुराना विजय, दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंत कुमार एल., माधव तिवारी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.









