वृत्तसंस्था/ हैदराबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे.
आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषकावर आपले नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने याआधी सलग दोन विजय मिळविले असून आता ते मंगळवारच्या सामन्यात आपली विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत मुंबई संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांना पहिल्या दोन सामन्यात हार पत्करावी लागली होती. रविवारच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला फलंदाजीचा सूर बऱ्याच प्रमाणात मिळाल्याचे जाणवले. तत्पूर्वी त्याला चार डावात खातेही उघडता आले नव्हते. पण मुंबईतील रविवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 43 धावा जमविल्याने मुंबई संघाने कोलकाता संघाचा 5 गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात कोलकाता संघाकडून मुंबईला 186 धावांचे कठीण आव्हान मिळाले होते. अशा स्थितीत मुंबईने हा सामना 14 चेंडू बाकी ठेवून जिंकला. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सलामीचा फलंदाज ईशान किशनने 25 चेंडूत 58 धावा झोडपल्या होत्या. मुंबई संघाच्या पहिल्या दोन सामन्यात ईशान किशनही फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. या संघातील तिलक वर्माकडून फलंदाजीत सातत्य दिसून येते. कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड हे या संघातील उपयुक्त फलंदाज आहेत. पीयूष चावला, ऋतिक शोकीन हे या संघातील फिरकी गोलंदाज आहेत. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चर याच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्सने पहिले चार सामने खेळले आहेत. आर्चर अद्याप कोपरा दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही. या स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने तसेच जान्सेनने आयपीएलमध्ये आपले पदार्पण केले होते.
सनरायजर्स हैदराबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. या संघातील हॅरी ब्रुक आणि अभिषेक त्रिपाठी यांच्या शानदार कामगिरीमुळे हैदराबाद संघाला आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकता आले आहेत. हॅरी ब्रुकने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूत शतक झळकविले होते. तर अभिषेक त्रिपाठीने 48 चेंडूत 74 धावा झोडपल्या होत्या. ब्रुक आणि त्रिपाठी यांच्या शानदार कामगिरीमुळे हैदराबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन विजय नोंदविले आहेत. त्रिपाठीने पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. या संघाचा कर्णधार मार्करमने गेल्या दोन सामन्यात संघाच्या विजयात आपला हातभारही लावला आहे. त्याने गेल्या दोन सामन्यात अनुक्रमे 50 आणि 37 धावा जमविल्या आहेत. अगरवालला दुखापत झाल्याने त्याला अधिक धावा जमविता आलेल्या नाहीत. सनरायजर्स हैदराबाद संघातील फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडेने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 6 गडी बाद केले आहेत. उमरान मलिक, मार्को जान्सेन आणि भुवनेश्वर कुमार हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. आता मंगळवारच्या सामन्यात जान्सेन जुळे बंधू परस्पराविरुद्ध लढणार आहेत. ड्युआन जान्सेन मुंबई इंडियन्सचे तर मार्को जान्सेन सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करीत आहे. मंगळवारच्या सामन्यात कदाचित या दोन्ही जुळ्या भावांना अंतिम अकरा खेळाडूत संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई इंडियन्स संघ- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, ब्रिव्हेस, तिलक वर्मा, ईशान किशन, टी. स्टब्ज, विष्णू विनोद, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, मुलानी, मेरेडिथ, वधेरा, शोकीन, अर्शद खान, ड्युआन जान्सेन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, आर्चर, बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
सनरायजर्स हैदराबाद- मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जान्सेन, वॉशिंग्टन सुंदर, फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमर मलिक, हॅरी ब्रुक, मयांक अगरवाल, क्लासेन, आदिल रशिद, मयांक मार्कंडे, व्ही. शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयांक डागर, नितीशकुमार रे•ाr, अकिल हुसेन आणि अनमोलप्रित सिंग.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.









