संग्राम काटकर,कोल्हापूर
Kolhapur News : तब्बल 25 वर्षांचा अनुभव घेऊन मुंबईतील स्थायिक मूर्तीकार सतिश वळीवडेकर गणेशमूर्ती कामासाठी कोल्हापुरात आले आहेत. ते यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोल्हापुरी मंडळांनी पूर्वीपासूनच्या दिलेल्या ऑर्डरीनुसार उंच गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. आयर्विन ख्रिश्चन मल्टीपर्पज हॉलजवळील मंडपात ते गणेशमूर्ती बनवत आहेत मंडळांच्या ऑर्डरीनुसार 21 फुट, 7, 11 फुटी 2 आणि 7 ते 9 फुटी तीन गणेशमूर्ती मुंबई स्टाईलने बनवणार आहेत. या मूर्ती आता कोल्हापुरातच मिळणार असल्याने मंडळांना गणेशमूर्ती आणण्यासाठी मुंबईची साडे चारशे किलो मीटरची मारावी लागणारी फेरी थांबणार नाही. शिवाय मुंबईकडे जाताना मंडळांना कराव्या लागणाऱ्या वाहन, इंधन खर्चातही हजारो रुपयांची बचत होणार आहे.
सतिश हे मुळचे शेणगाव (ता. भूदरगड) येथील रहिवाशी. साठ वर्षांपूर्वी वडील शांताराम वळीवडेकर यांनी मूर्तीकाम सुरु केले. जेमतेम ऑर्डरीनुसार ते गणेशोत्सवासाठी घरगुती व मंडळांना गणेशमूर्ती बनवून देऊ लागले. पन्नास वर्षापूर्वी त्यांनी आपल्या कलेला पैशाची जोड मिळावी, म्हणून मुंबईत जाऊन मूर्तीकामाचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईत कांदीवली येथे भाड्याने घर घेऊन मूर्तीकाम सुऊ केले. त्यांनी साकारलेल्या घरगुतीपासून सहा फुटांपर्यंतच्या आकर्षक गणेशमूर्तींकडे गणेशभक्त, मंडळे आकर्षित झाले. त्यामुळे त्यांच्या मूर्तीला मागणी येऊ लागली. त्यांना मुले सुनील, अनिल, सतिश व संजय यांचीही मूर्तीकामात मदत मिळू लागली. गणेशोत्सवानंतर शांताराम फिल्म इंडस्ट्रीजसाठी लागणारे सेटअपही तयार करत होते. त्यामुळे घरात चार पैसे जादा येऊ लागले.
मूर्तीकाम चांगल्या पद्धतीने सुऊ असतानाच 1996 साली वडिलांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलांनी मूर्तीकामाचा वारसा पुढे चालू ठेवला. सतिश हे उंच गणेशमूर्ती तर तीन भाऊ घरगुती व पाच-सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बनवू लागले. सतिश यांनी उंच गणेशमूर्ती कशी बनवायची, त्यात सौंदर्य कसे आणायचे, रंगाचा मेळ कसा करायचा याचे ज्ञान मूर्तीकार (कै.) विजय खातू यांच्याकडून घेतले. त्याच्या जोरावर सतीश यांनी 2012 पासून मुंबईतील लालबागमध्ये गणेशमूर्तीचा कारखाना सुरु केला. त्यांना 11 ते 21 फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींची ऑर्डर मिळू लागली.फिनीशिंग व आकर्षक रंगकामामुळे मुंबईतील एक चांगले मूर्तीकार म्हणून ते प्रसिद्धीस आले. प्रतिवर्षी 40 ते 45 मूर्ती बनवून त्या मंडळांनी वितरित कऊ लागले. त्यांनी 15 वर्षात बनवलेल्या उंच गणेशमूर्तींना मंडळांनी मुंबईचा राजा, कुलाब्याचे युवराज, परळचा राजा, नरेपार्कचा राजा, उमरखाडीचा राजा, लक्ष्मी कॉटेजचा राजा, पोष्टगल्लीचा राजा, दुसरी, तिसरी आणि सातवी खेतवाडीचा राजा अशी नावे दिली. याची महती सात वर्षापूर्वी कोल्हापुरात येऊन धडकली. त्यावर प्रभावीत होऊन शाहूपुरीतील शिवतेज मित्र मंडळाने त्यांना गणेशमूर्तीची पहिली ऑर्डर दिली.
सतिश यांचे मूर्तीकाम काम पाहून कसबा बावड्यातील सम्राट मित्र मंडळ, राजारामपुरी 12 व्या गल्लीतील बलभीम तऊण मंडळ व शालिनी पॅलेसजवळील शालिनी पॅलेस मित्र मंडळसह अन्य मंडळांनी गणेशमूर्तीची ऑर्डर दिली. मुंबईत जाता-येता वाटेत पडणाऱ्या पावसातही गणेशमूर्तीला सहीसलामत मंडळस्थळी आणू लागले. यंदाच्या गणेशोत्सावात मात्र ही सारी कसरत थांबणार आहे. मंडळांना गणेशमूर्ती बनवून देण्यासाठी सतिश हे आयर्विन ख्रिश्चन मल्टीपर्पज हॉलजवळ गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. दीड महिन्यात मूर्तीचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.
दिलबहार, विश्वशांती, शिवाजी चौक संयुक्त मंडळांनी दिल्या नव्याने साकारणार…
मी कोल्हापुरात येत असल्याचे कळताच यंदाच्या गणेशोत्सवासाठी दिलबहार तालीम मंडळाने 13 फुटी तर सुभाष रोडवरील विश्वशांती तऊण मंडळ, छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाने 21 फुटी गणेशमूर्तींच्या ऑर्डरी दिल्या होत्या. मंगळवार पेठ बेलबागेतील अमर तऊण मंडळ व यादवनगरातील इंडियन ग्रुपकडूनही उंच गणेशमूर्तींच्या ऑर्डरी मिळाल्या आहेत. त्यानुसार मूर्ती बनवण्याचे काम सुऊ आहे. या मूर्तींमधून मुंबई स्टाईलच्या गणेशमूर्तींचे दर्शन घडवणार आहे. शिवाय दरवर्षी कोल्हापुरात येऊन जास्तीत जास्त मंडळांना गणेशमूर्ती बनवून देणार आहे.
सतिश वळीवडेकर (मूर्तीकार)