विराट कोहली, डु प्लेसिसची आक्रमक अर्धशतके, मुंबईचा आठ गडी राखून पराभव : तिलक वर्माची 84 धावांची खेळी वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (49 चेंडूत नाबाद 82) व सामनावीर डु प्लेसिस (43 चेंडूत 73) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी मुंबईने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 171 धावा जमवल्या. यानंतर आरसीबीने विजयाचे लक्ष्य 16.2 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. विराट व डु प्लेसिसने 148 धावांची सलामी देत विजयात मोलाची भूमिका बजावली.

प्रारंभी, आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. तिसऱ्याच षटकातच मुंबईला पहिला धक्का बसला. सलामीवीर इशान किशन (13 चेंडूत 10) स्वस्तात बाद झाला. यानंतर आलेला ग्रीनही 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहितला 5 व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर एक जीवदान मिळाले. दिनेश कार्तिक आणि सिराजच्या गोंधळात त्याचा झेल सुटला. मात्र पुढच्याच षटकात आकाशदीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रोहितला 10 चेंडूत केवळ एकच धावा काढता आली. त्यानंतरही मुंबईचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 7 गडी गमावत 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्माने 46 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 84 धावांची नाबाद खेळी केली. शेवटच्या षटकांत मोठे फटके खेळून त्याने मुंबईच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याला नेहाल वधेरा (13 चेंडूत 21) व अर्शद खान (9 चेंडूत नाबाद 15) यांनी अखेरच्या टप्प्यात चांगली साथ दिली.

विराट, डु प्लेसिसची आक्रमक अर्धशतके
प्रत्युतरादाखल खेळताना सलामीवीर विराट कोहली व डु प्लेसिसच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने दमदार सुरुवात केली. या जोडीने 14.5 षटकांत 148 धावांची सलामी देत आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. विराटने 49 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारासह नाबाद 82 धावा फटकावल्या. डु प्लेसिसने त्याला चांगली साथ देत 43 चेंडूत 5 चौकार व 6 षटकारासह 73 धावांचे योगदान दिले. 15 व्या षटकांत अर्शद खानने डु प्लेसिसला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर विराटने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने उरलेले आव्हान 17 व्या षटकांत पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 7 बाद 171 (रोहित शर्मा 1, इशान किशन 10, कॅमरुन ग्रीन 5, सुर्यकुमार यादव 16 चेंडूत 15, तिलक वर्मा 46 चेंडूत नाबाद 84, वधेरा 21, टीम डेविड 4, अर्शद खान नाबाद 15, कर्ण शर्मा 32 धावांत 2 बळी, मोहम्मद सिराज, आकाशदीप, ब्रेसवेल, हर्षल पटेल, टोप्ले प्रत्येकी एक बळी)
आरसीबी : 16.2 षटकांत 2 बाद 172 (विराट कोहली 49 चेंडूत नाबाद 82, डु प्लेसिस 43 चेंडूत 73, दिनेश कार्तिक 0, मॅक्सवेल नाबाद 12, अर्शद खान 28 धावांत 1 बळी, ग्रीन 30 धावांत 1 बळी)








