मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईला सकाळपासुन पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांचा गोंधळ उडाला आहे. मध्य रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगर अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर न मुलुंड, भांडुप, घाटकोपर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच रेल्वे स्थानकादरम्यान देखील पाणी भरले आहे.








