भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथितपणे आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गुन्हे शाखा युनिट, एक्स तांत्रिक तज्ञ आणि सायबर तज्ञांच्या मदतीने हा तपास सुरू झाला आहे. या व्हिडियो प्रकरणी सोमय्या यांचीही तपासणी होणार असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशन काळात या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी उचलून धरली होती. विधानसभेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर विधानपरिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी सरकारवर टिका करून चैकशीची मागणी केली होती. महाविकास आघाडीने विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांना 8 तासांचा व्हिडिओ पेन ड्राईव्ह सादर केला होता.
त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासाचे निर्देश दिले होते. तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी उच्चस्तरीय तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बुधवारी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून या घटनेची सविस्तर चौकशी करून त्याचा प्राधान्यक्रमाने अहवाल देण्याचीही मागणी केली आहे.








