वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या 2025 च्या टेनिस हंगामातील चौथ्या मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेला येथील सीसीआयच्या टेनिस कोर्टवर शनिवार दि. 1 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेतील प्रमुख ड्रॉसाठीच्या प्रवेशाकरीता पात्र फेरी 1 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार असून प्रमुख ड्रॉतील सामने 3 फेब्रुवारीपासून सुरु होतील. 9 फेब्रुवारीला स्पर्धेतील अंतिम सामने खेळविले जातील. मुंबईतील टेनिस शौकिनांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक नवोदित टेनिसपटूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजन समितीचे सदस्य संजय खांडरे आणि प्रविण दरडे यांनी सांगितले. मुंबई खुली टेनिस स्पर्धा यापूर्वी तीन वेळा यशस्वीपणे भरवली गेली. टेनिसपटूंचा या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.
डब्ल्यूटीए टूरवरील 125 दर्जाची ही स्पर्धा असून तातीयाना मारिया चौथ्यांदा महिला एकेरीचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. 2022 साली तातीयाना मारियाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची उपांत्यफेरी गाठली होती. मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात कॅनडाची रिबेका मॅरीनो, स्पेनची नुरीया डायज, लॅटव्हीयाची सिमेनीस्टेजा, फिलिपिन्सची 19 वर्षीय इला यांच्यामध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल.









