वृत्तसंस्था/ लंडन
ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या दिवशी अपग्रॅड मुंबई मास्टर्सने गँजेस ग्रँडमास्टर्स संघावर 14-5 अशा गुणफरकाने दणदणीत विजय मिळविला. माजी ब्लिट्झ वर्ल्ड चॅम्पियन मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हने पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का दिला.
दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात या लढतीत उतरले होते. पहिल्या लढतीत दोन्ही संघांना समान फरकाने पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या दिवशीच्या लढत पहिल्या पटावर विश्वनाथन आनंद व व्हॉशियर लॅग्रेव्ह यांच्यात महत्त्वाचा मुकाबला झाला. आनंद पटावर चांगल्या स्थितीत असूनही त्याने मोहऱ्याचा बळी देण्याची चूक केली. त्याचा लाभ घेत लॅग्रेव्हने आनंदवर बाजू पलटवली. लॅग्रेव्हवर वेळेचा दबाव होता. पण त्याने ब्लिट्झमधील अनुभवाचा वापर करीत भक्कम नियंत्रण मिळविले आणि आपल्या संघासाठी महत्त्वाचा विजय मिळविला. मुंबई मास्टर्सने यानंतर पूर्ण नियंत्रण मिळविले. युवकांच्या डावात विजय मिळविला तर महिलांच्या दुसऱ्या बोर्डवर बरोबरी साधत आघाडी घेतली.
गँजेस ग्रँडमास्टर्सना मात्र त्यांना प्रयत्न करूनही गाठता आले नाही. जागतिक तिसऱ्या मानांकित अर्जुन एरिगेसीने भरपूर प्रयत्न केले तरी वेळेच्या बाबतीत पुढे असूनही त्याला विदित गुजराथीविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. कोनेरू हंपीने आर. वैशालीचा पराभव केल्यानंतर गँजेसची स्थिती आणखी बिघडली. परहॅम मागसूदलूने पीटर स्विडलरवर संघर्षपूर्ण विजय मिळवित गँजेसची थोडी पत राखली. मात्र 14-5 अशा फरकाने पराभव होण्यापासून वाचण्यास ते पुरेसे ठरले नाही.
मुंबई मास्टर्सने गुणाचे खाते खोलण्यात यश मिळविले तरी गँजेसला सलग दोन पराभव स्वीकारावे लागले असल्याने त्यांचे पुढील काम अवघड होऊन बसले आहे. त्यांना शर्यतीत राहण्यासाठी लवकरात लवकर सावरणे गरजेचे आहे. मुंबई मास्टर्सची पुढील लढत अल्पाईन एसजी पाईपर्सशी तर गँजेस ग्रँडमास्टर्सची लढत त्रिवेणी काँटिनेन्टल किंग्सशी होणार आहे.