वृत्तसंस्था / मुंबई
राजेश सुतार आणि आवेश खान यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई मराठा रॉयल संघाने मुंबई लीग टी-20 स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. राजेश सुतारने शानदार अर्धशतक झळकविले. तर आवेश खानने 38 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात मुंबई मराठा रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई फाल्कन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई फाल्कन्सने 20 षटकात 4 बाद 157 धावा जमविल्यानंतर मुंबई मराठा रॉयल्सने 19.2 षटकात 5 बाद 158 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकत स्पर्धेचे विजेतेपद हस्तगत केले. या सामन्यात मुंबई फाल्कन्सच्या डावात मयुरेश तांडेलने नाबाद 50 धावा झळकविल्या. हर्ष अघावने नाबाद 45 धावांचे योगदान दिले. मयुरेश आणि हर्ष यांनी अभेद्य 85 धावांची भागिदारी 49 चेंडूत नोंदविल्याने मुंबई फाल्कन्सला 157 धावांपर्यंत मजल मारता आली. 10 षटकाअखेर मुंबई फाल्कन्सची स्थिती 3 बाद 60 अशी होती. 12 व्या षटकाअखेर त्यांनी 4 बाद 72 धावा जमविल्या होत्या. श्रेयस अय्यर लवकर बाद झाला. अघावने नाबाद 45 धावांमध्ये 4 षटकार खेचले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई मराठा रॉयल्स संघातील चिन्मय सुतारने 53 धावा झोडपल्या. आवेश खानने 38 धावांचे योगदान दिले.
मुंबई फाल्कन्स 20 षटकात 4 बाद 157 (मयुरेश तांडेल नाबाद 50, हर्ष अघावर नाबाद 45, वैभव माळी 2-32), मुंबई मराठा रॉयल्स 19.2 षटकात 5 बाद 158 (चिन्मय सुतार 53, आवेश खान 38)









