वृत्तसंस्था / बेंगळूर
2024 च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुस्ताकअली टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे मुंबई आणि मध्यप्रदेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. मुंबई संघातील खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत असून मध्यप्रदेशच्या भक्कम अष्टपैलु कामगिरीला त्यांचे आव्हन राहिल. या सामन्याला दुपारी 4.30 वाजता प्रारंभ होईल.
मुंबई संघातील कर्णधार श्रेयेस अय्यर, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ यांची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. अजिंक्य रहानेने या स्पर्धेत 8 सामन्यांतून 432 धावा जमविल्या असून त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा श्रेयेस अय्यरने 8 सामन्यातून 329 धावा जमविल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांच्याकडूनही फटकेबाजीची अपेक्षा बाळगली जात आहे. मात्र गोलंदाजीत मुंबईचे गोलंदाज सातत्य राखू शकत नसल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मोहीत अवस्थी आणि शार्दुल ठाकुर आणि दुबे त्याच प्रमाणे तनुष कोटीयान, शेडगे, अंकोलेकर यांनी बडोदा संघाला 158 धावांवर रोखले.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश संघाकडून मुंबई संघातील असलेल्या उणिवांचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न राहिल. 2022 साली मुंबईने ही स्पर्धा पहिल्यांदाज जिंकली होती. मध्यप्रदेशने उपांत्य सामन्यात दिल्लीचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत मध्यप्रदेशच्या रजत पाटीदारने 347 धावा जमविताना 4 अर्धशतके झळकविली आहेत. मध्यप्रदेशचा संघ यावेळी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. मध्यप्रदेश संघातील अष्टपैलु व्यंकटेश अय्यर याची कामगिरी आजपर्यंत समाधानकारक झाली आहे. त्याने फलंदाजीत 210 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने 6 गडी बाद केले आहेत. मध्यप्रदेशचे गोलंदाज आवेश खान आतापर्यंत या स्पर्धेत 10 गडी तर टी. सिंगने 7 तर कुमार कार्तिकेयने 16 गडी बाद केले आहेत. रविवारच्या सामन्यात मुंबईची फलंदाजी आणि मध्यप्रदेशची गोलंदाजी यांच्यात खरी चुरस पहावयास मिळेल.









