वृत्तसंस्था/ रायपूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मुंबईला 98 धावांची आघाडी मिळाली आहे.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 351 धावा जमविल्या. सलामीच्या पृथ्वी शॉने 3 षटकार आणि 18 चौकारांसह 159 तर लालवानीने 10 चौकारांसह 102 धावा झळकाविल्या. छत्तीसगडतर्फे आशिष चौहानने 105 धावात 6 गडी तर रवीकिरणने 3 गडी बाद केले. त्यानंतर छत्तीसगडने पहिल्या डावात 350 धावा जमविल्या. कर्णधार अमनदीप खरेने 4 षटकार आणि 14 चौकारांसह 143 तर संजित देसाईने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 41 धावा जमविल्या. मुंबईच्या तुषार देशापांडेने 121 धावात 5 तर डायस आणि मुलानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मुंबईने 1 बाद 97 धावा जमवित एकूण 98 धावांची आघाडी मिळविली आहे. या सामन्यात मुंबईने छत्तीसगडवर केवळ एका धावेची आघाडी मिळविली. हा सामना अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे.
संक्षिप्त धावफलक – मुंबई प. डाव सर्व बाद 351 (पृथ्वी शॉ 159, लालवाणी 102), छत्तीसगड प. डाव सर्व बाद 350 (अमनदीप खरे 143, तुषार देशपांडे 5-121), मुंबई दु. डाव 1 बाद 97 (पृथ्वी शॉ 45, लालवाणी खेळत आहे 40).









